सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभाग : बालकांचे बालपण जपणारे बा‍‌लकालय
सरस्वती मंदिर ट्रस्टचां पूर्व प्राथमिक विभाग १९५५ साली सुरू झाला. संस्थेच्या संस्थापिका व विश्वस्त श्रीमती विमलाताई कर्वे यांनी या विभागाला शाळेचे औपचारिक स्वरूप न देता, हसत खेळत अनौपचारिक बाल शिक्षणाचे केंद्र म्हणून वाढविले. मुलांना गाणी, गोष्टी, गप्पा, खेळ, प्रत्यक्ष खेळातून अनुभव आणि निरीक्षणातून भोवतालचे परिसर ज्ञान व्हावे, त्यांची विचारशक्ती वाढावी या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान हे चिरकाल टिकणारे असते. मुलांची नैसर्गिक जिज्ञासा वाढीस लागावी म्हणून या विभागात वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते.
वार्षिक उपक्रम
संकल्पना सप्ताह, रंगसप्ताह, आहारसप्ताह, आकारसप्ताह, भाजीबाजार, विविध प्रकल्प, बालस्वातंत्र्य दिन, मातृदिन, वसंत उत्सव.

शाळेचे खास वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
बालवाचनालय : लहान वयात मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून रंगीबेरंगी, चित्रमय पुस्तकांचे आदान प्रदान.
खेळ लायब्ररी : अनेक मनोरंजनाचत्मक, शैक्षणिक व वैजानिक खेळ, सीडीज, कॅसेट्सपालकांच्या मदतीने ठराविक मुदतीसाठी घरी नेऊन मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात.

सण उत्सव : धार्मिक आणि सांस्कृतिक सण, उत्सव जसे वट पौर्णिमा (वृक्षदिंडी), दसरा (शैक्षणिक खेळांचे पूजन ), कालाष्टमी (खाऊहंडी), श्रावणी शुक्रवार (सामूहिक स्पर्धा), कोजागिरी पौर्णिमा, संक्रांत (बाहुलीचे बोरनहाण) यातूनच नकळत मूल्यसंस्कार होतात.

विविध स्पर्धातून सहभाग
शैक्षणिक विकासाबरोबरच विविध शालाबाह्य स्पर्धांतून सहभागी होण्यासाठी बालकांना विशेष प्रोत्साहन दिले जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. प्रतिष्ठित स्पर्धांतून शाळेचे विध्यार्थी व शिक्षक सहभागी होउन नेत्रदीपक यश मिळवितात व मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरतात.

पालक व्यासपीठ आणि गट चर्चा ४
पालकांचा पाल्याच्या शिक्षण प्रक्रियेतील सहभाग अतिशय मोलाचा असतो. पालकांसाठी संस्थेतर्फे तज्ञ व्यक्तींच्या प्रबोधनपर पालकशाळा, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पालकांसाठी उद्बोधक पुस्तकांचे वाचनालय कार्यान्वित आहे. विशेष म्हणजे पालक स्वयंस्फूर्तीने एकत्र येतात, परस्परांमध्ये मुलांच्या संदर्भातील अनुभव, समस्यांची चर्चा करतात. अभ्यास, वर्तन, मानसिकता या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवितात. उत्साही, कल्पक आणि मेहनती मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर सेवक वर्ग हे या विभागाचे बलस्थान आहे.
१९९७ मध्ये महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेतर्फे अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून बालशिक्षणाचे कार्य करणारी शाळा म्हणून पूर्व प्राथमिक विभागाचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.

सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभागाला राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद तर्फे शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त . (NATIONAL AWARD FOR INNOVATIVE PRACTICES AND EXPERIMENT IN EDUCATION FOR SCHOOL’S AND TEACHER EDUCATION INSTITUTIONS.)

मराठी माध्यम, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विशेष कार्याचा गौरव म्हणून या विभागांना “पद्मभूषण ताराबाई मोडक विशेष संस्था” हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.